रत्नागिरी : खेड -दापोली तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी तात्काळ राष्ट्रीय आपत्ती सेवा दल (एनडीरफ) तैनात करण्यात येऊन मदत कार्य हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यात बुधवार सायंकाळ पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या खेड दापोली भागात पडणा-या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी खेड बाजारात शिरण्यास सुरुवात झाली. देवना पुल, तांबे मोहल्ला येथील रस्त्यावर रात्री पाणी भरण्यास सुरुवात झाली.
खेड शहर भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आपत्ती दलाला तात्काळ पाचारण करण्यात येऊन मदत कार्याला सुरुवात करण्यात आली. गुरुवारी देखील पावसाने जिल्ह्यातील काही भागात जोर कायम ठेवल्याने खेडसह इतर तालुक्यात देखील पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड शहरात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे खेड नगर पालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा म्हणून व्यापा-यांचा माल आणि माणसांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. या मुसळधार पावसामुळे खेड दापोली रस्ता बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणा-या पावसामुळे खेड आणि दापोली भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात खेड आणि दापोली तालुक्यात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. खेडमध्ये सरासरी १२१ मिलीमीटर तर दापोलीमध्ये ११९.४० मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी एकूण ६९२.२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.