पुणे – करोनामुळे शहरात संचारबंदी असतानाही महमंदवाडीतील कंजारभाट वस्तीवर हातभट्टी दारू तयार करण्यात येत होती. तेथे गुन्हे शाखेने छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे 15 हजार लिटर रसायन, 150 लिटर दारू मिळून 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी बसंती विजय बिनावत (वय 40, रा. कंजारभाट वस्ती, महंमदवाडी ) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंजारभाट वस्तीवर गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, त्याठिकाणी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे 15 हजार लिटर रसायन, 150 लिटर दारू जप्त केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रदीप सुर्वे, संतोष मोहिते, दत्ता काटम, प्रवीण शिंदे, भरत रणसिंग, अमजद पठाण, स्नेहल जाधव, प्रमोद घाडगे, दया शेगर, संजय दळवी यांच्या पथकाने केली.