पुणे शहरावर आता पुराचे संकट?

शहरात 39 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मदत केंद्र

पुणे – शहरावरील करोनाचे सावट दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच आता पावसाळ्यात येणाऱ्या पूराचे नवीन संकट असणार आहे. त्यामुळे पावसाळा अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्याने पालिकेने 1 जूनपासून 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 39 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मदत कक्ष उभारले आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्याही केल्या आहेत.

मागील वर्षी शहरात जवळपास पाच महिने पावसाळा सुरू होता. जून महिन्यात त्यास सुरुवात झाल्यानंतर ऑक्‍टोबर अखेरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शहराच्या अनेक भागांत अतिवृष्टीमुळे नाल्यांच्या बाजूला पूरजन्य स्थिती उद्‌भवली होती.

तसेच, काही भागातील नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले. त्यात प्रामुख्याने आंबिल ओढ्याला आलेल्या पूराचा समावेश होता, तर शहरात जिथे नाले अथवा नदी नाही अशा भागांतही ड्रेनेजची अर्धवट कामे, सिमेंटचे रस्ते यामुळे पूरजन्य स्थिती उद्‌भवून शेकडो घरात पाणी घुसले होते. त्यातच, या वर्षीही देशात 100 टक्‍के पावसाचा अंदाज वर्तवला असून राज्यात मान्सून वेळेत दाखल होणार आहे. त्यामुळे शहरात मागील वर्षीसारखी स्थिती उद्‌भवल्यास तयारी असावी, या उद्देशाने महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

त्यांतर्गत 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत असलेल्या शाळांमध्ये सुमारे 39 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मदत कक्ष उभारण्यात येणार असून या मदतकेंद्रासाठी सहायक आयुक्‍त (क्षेत्रीय अधिकारी) यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्‍ती केली आहे. त्यामुळे आता करोनासोबतच पुणेकरांवर पावसाचे सावट उभे राहणार आहे.

शहरात मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुरू होणार
आपत्ती व्यवस्थापन मदत केंद्रासह शहराचे महापालिकेच्या मुख्यालयातील मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्षही कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्याचे आदेश आयुक्‍तांनी काढले आहेत. त्यानुसार, हा कक्षसुद्धा येत्या 1 जूनपासून सुरू होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.