पूरग्रस्त वाऱ्यावरच! महापालिका म्हणते, ‘शासन देईल तीच मदत’

पुणे – पावसाने महापालिका हद्दीतील सुमारे 1,850 कुटुंबे बाधित झाली. मात्र, या नागरिकांना आता मदत देण्यास महापालिका प्रशासनाने हात वर केले आहेत. “पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून मदत देण्यात येईल,’ असे सांगत “आम्हाला त्यांना मदत देण्यास कायद्याचे बंधन आहे,’ अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

चारही धरणे 100 टक्के भरली होती. त्यामुळे मुठा नदीत सुमारे 50 हजार क्‍युसेक विसर्ग करण्यात आला. घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर महापालिकेने नागरिकांची केवळ निवासाची त्यानंतर साफसफाईची व्यवस्था केली. मात्र, ज्यांचे संसार वाहून गेले त्यांच्यासाठी अद्याप एका दमडीची अथवा कोणतेही साहित्य देण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. प्रत्यक्षात ज्या भागात पाणी घुसले, त्यातील अनेक झोपडपट्ट्या घोषित असून त्यांच्याकडून महापालिकेस झोपडपट्टी सेवाशुल्कही भरले जाते. त्यामुळे महापालिकेकडून आम्हाला किमान संसारपयोगी साहित्य तरी मिळावे, अशी मागणी हे पूरग्रस्त करत आहेत.
पंचनाम्याचीही माहिती नाही

पूरग्रस्तांना काय मदत दिली जाणार, याबाबत उपायुक्त सुनील इंदलकर यांच्याकडे विचारणा केली असता, “शासनआदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही मदत देण्यात येणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. मात्र, महापालिका काय मदत देणार, याबाबत त्यांना काहीच सांगता आले नाही. पूरग्रस्तांच्या मदतीचा प्रस्ताव, जिल्हा प्रशासनाने त्याचे पंचनामे केले आहेत किंवा नाहीत याची माहितीही पालिकेने घेतली नसल्याचे समोर आले.

2 कोटींचा निधी अंदाजपत्रकातच
मागील वर्षी खडकवासला उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 900 घरांमध्ये पाणी घुसले होते. या वेळी महापालिकेने या पूरग्रस्तांना 11 हजार रुपये मदतीची घोषणा केली. नंतर पैसे देता येत नसल्याने संसारोपयोगी साहित्य देण्याची घोषणा केली. मात्र, या दोन्हींपैकी अद्याप काहीच देण्यात आलेले नाही. या दुर्घटनेनंतर आयुक्तांनी शहरात अशी आपत्कालिन स्थिती उद्‌भवल्यास तातडीची मदत देता यावी म्हणून 2 कोटींची तरतूद केली आहे. मात्र, आता प्रशासन “या झोपड्या अनधिकृत आहेत, पालिकेला अशी मदत देता येत नाही’ असे सांगत नागरिकांना वाऱ्यावर सोडत आहे.

परिसर आणि बाधित घरांचा आकडा
शांतीनगर, भारतनगर, इंदिरानगर, विश्रांतवाडी-365
वाकडेवाडीतील पाटील इस्टेट – 375
राजीव गांधीनगर, कामगार पुतळा-317
बोपोडी आदर्शनगर-300
औंध-25
बाणेर-बालेवाडी-180
ताडिवाला रस्ता झोपडपट्टी-50
साईनाथनगर-45
मंगळवार पेठ-104
खिलारे वस्ती-28
वारजे-16
सिंहगड रस्ता – 25 ते 30

पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी आयुक्‍त आणि प्रशासनाशी चर्चा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, त्यावर तोडगा काढून या नागरिकांनाही मदत देण्यासाठी निर्णय घेतला जाईल.
– मुक्‍ता टिळक, महापौर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)