पुणे – मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी नेमकी कोणावर कारवाई करायची, याबाबत महापालिका प्रशासन संभ्रमात आहे.
महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी भाजप इच्छुक, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शहरात बॅनर आणि फ्लेक्सबाजी केली. यापैकी मान्यताप्राप्त होर्डिंग वगळता सर्वच ठिकाणी अनधिकृत फ्लेक्सबाजी झाली होती. कोथरूड येथे लावलेल्या फ्लेक्समुळे रुग्णवाहिकाच अडकून पडली. या बॅनरबद्दल सर्वचस्तरातून टीकेची झोड उठली.
या बॅनरबाजीचा अतिरेक मुख्यमंत्र्यांना रुचला नाही. त्यामुळे त्यांनी याची गंभीर दखल घेत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर बॅनरबाजांचे कानही उपटत पक्षांतर्गत कारवाईचा इशाराही दिला होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेले स्पष्टीकरण हे पक्षापूरते सिमित आहे. परंतु, प्रशासन म्हणून पालिकेने या बॅनरबाजीला व फ्लेक्सबाजीला तितक्याशा गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. महाजनादेश यात्रा गेल्यानंतर प्रशासनाने 2 दिवसांत बेकायदा 4,331 बॅनर्स, फ्लेक्स, झेंडे काढले. मात्र, अद्याप एकही गुन्हा दाखल किंवा इतर कोणतीही कारवाई केली नाही. यासंदर्भात अति. आयुक्त शंतनू गोयल म्हणाले, तक्रार करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तक्रार करायची तर कोणावर करायची, फ्लेक्सवर नाव असणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला तर संबंधित माननीय आपण फ्लेक्स लावला नाही, कार्यकर्त्यांनी लावले असे म्हणतील, मग अशावेळी नेमके कोणत्या कार्यकर्त्याला जबाबदार धरायचे, असे अनेक प्रश्न आहेत. तरीही संपूर्ण चौकशी करून कारवाई केली जाईल, असे गोयल यांनी सांगितले.