लाखणगाव परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत : तोडणी थांबवली
लाखणगाव – पितृपंधरवड्यामुळे झेंडू फुलांचे बाजारभाव गडगडल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आता नवरात्रोत्सवात बाजारभाव वाढतील, या आशेवर शेतकरी फूल शेती सांभाळत आहे.
आंबेगाव तालुक्यातील भागडी येथील शेतकरी दिनेश हनुमंत थिटे यांची तीन एकर झेंडुची व दीड एकर शेवंतीची फुलशेती आहे. सध्या झेंडू व शेवंतीच्या फुलांना बाजारभाव मिळत नाही. नवरात्रोत्सवात बाजारभाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी फुले तोडणे बंद केले आहे.
गणेशोत्सवात झेंडुच्या फुलांना प्रति किलो 50 रुपये तर शेवंतीला 100 रुपये बाजारभाव मिळाला होता, परंतु पितृपंधरवडा सुरू झाल्यानंतर फुलांचे बाजारभाव कमी झाले आहेत. दोन ते तीन रुपये किलो बाजारभाव असल्याने तोडणी आणि वाहतूक खर्च परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने ओली फुले बाजारपेठेत जाईपर्यंत काळी पडतात. त्यामुळे बाजारपेठेत फुले पाठविणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. मजुरांना मजुरी देऊन आर्थिक नुकसान शेतकरी सहन करीत आहे.