फ्लॅटचा ताबा मिळाला? (भाग-२)

फ्लॅटचा ताबा मिळाला? (भाग-१)

कागदपत्रांची पूर्तता : फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर विकसकांने आणखी काही कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर त्याच्याकडून ती मूळ कागदपत्रे मागवून सत्यप्रत त्याच्या हवाली करावीत. कर्ज काढून फ्लॅट घेतला असेल तर बॅंकांना ताबा मिळाल्यानंतर आणखी काही कागदपत्रांची गरज भासत असते. यासंदर्भात बिल्डरला सांगून ती कागदपत्रे मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून बॅंकेंला तांत्रिक अडचण येणार नाही. याशिवाय एनओसी, वीज कनेक्‍शनचे कोटेशन, पार्किंगचा नंबर, लाईटबिलाची मूळ पावती, आतापर्यंत भरलेल्या मालमत्ता कराचा तपशील, हस्तांतरण करारपत्र, भोगवटा पत्र, ऍग्रीमेंट टू सेल, सेल डीड अशांची चाचपणी करून ती कागदपत्रे ताब्यात घ्याव्यात. जेणेकरून भविष्यात आपल्याला अडचणी येणार नाहीत. याशिवाय वीज वितरण व्यवस्थेचा मॅप, पाणीपुरवठ्याचा तपशील, कॉमन बिलाचा तपशील, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, आपत्कालीन स्थितीतील व्यवस्था या बाबी तपासून घेणे महत्त्वाचे ठरते.

गृहप्रकल्पाची देखभाल : काही विकसक नवीन गृहप्रकल्पाची देखभाल काही वर्षे आपल्याकडेच ठेवतात. साधारणत: तीन ते पाच वर्षे इमारतीच्या देखभालीचा कार्यभार उचलतात. यासाठी त्यांनी फ्लॅटधारकांकडून आगाऊ रक्कमही घेतलेली असते. जर बिल्डर देखभाल करणार नसले तर सोसायटीतील सर्वांनी एकत्र येऊन देखभालीचा खर्च निश्‍चित करणे आणि मासिक किंवा वार्षिक खर्चाचा हिशेब ठरवून त्यानुसार मेंटेनन्स आकारणी करावी लागते. त्यासाठी खर्चाचा ताळेबंद ठेवावा लागतो. दरवर्षी हिशोबासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करावी किंवा सीएकडे त्याचा कार्यभार सोपवावा जेणेकरून खर्चाबाबत वाद-प्रतिवाद निर्माण होणार नाही. सोसायटीवर होणारा खर्च वाजवी आहे की अधिक आहे, याचीही चाचपणी करावी लागते. मात्र सर्वसाधारणपणे बिल्डरच सुरवातीची काही वर्षे बिल्डिंगची देखभाल करतात. करार संपल्यानंतर जमा-खर्चाचा हिशेब सोसायटीला हस्तांतरित करतात.

– किर्ती कदम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.