मोशीतील बंद फ्लॅटला आग

अग्निशमन यंत्रणा व नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला

अग्निशमन यंत्रणेमुळे आग आटोक्‍यात

फ्लॅटला आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमध्ये असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी फ्लॅटचा दरवाजाचे लॉक तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला व इमारती मधील अग्निशमन यंत्रणा चालू करून पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्यास प्रारंभ केला. यामुळे आग जास्त पसरली नाही आणि आटोक्‍यात आणणे अग्निशामक विभागासाठी सोपे ठरले.

पिंपरी – मोशी मधील एका रहिवाशी इमारतीमधील बंद फ्लॅटला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी इमारतीधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केल्याने आग पसरली नाही. तसेच अग्निशामक दलाच्या जवांनानी घटनास्थळी जाऊन फ्लॅटमधील दोन गॅस सिंलेडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. गंधर्व एक्‍सलन्स सोसायटीच्या बाराव्या मजल्यावर स्वप्निल डेबुरकर राहतात. नेहमीप्रमाणे ते घर बंद करुन नोकरीला गेले होते. दरम्यान त्यांच्या बंद फ्लॅटला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

आग लागल्याचे लक्षात येताच सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील अग्निशमन यंत्रणा सुरु केली. त्यामुळे ही आग किचनपर्यंत आली नाही. दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवांनानी घटनास्थळी धाव घेतली. जवांनानी दोन्ही गॅस सिलेंडर बाहेर काढले. या आगीत फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कपडे, धान्य, इलेक्‍ट्रिकल वायरिंग बोर्ड पूर्णत: जळाले. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे दिलीप कांबळे, भरत फाळके, बाळासाहेब वैद्य, सुनील फरांदे, अनिल माने व रुपेश जाधव यांनी परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.