अबाऊट टर्न: फ्लॅशबॅक

हिमांशू

यात्रांचा सीझन संपून आता हेवीवेट स्टार प्रचारकांचे दिवस सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या नावांच्या यात्रा बहुतांश सगळ्याच पक्षांनी काढल्या. उभा महाराष्ट्र पिंजून काढला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापली भूमिका शक्‍य तितक्‍या लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न केला. आता मोठमोठ्या प्रचारतोफा गर्जू लागल्या असताना त्या यात्रांचं सगळ्यांनाच हळूहळू विस्मरण होईल. राजकीय पक्षांच्या यात्रांबरोबरच हातात “बूम’ घेऊन फिरणाऱ्या चॅनेलवाल्यांच्याही यात्रा झाल्या.

आता मोठमोठे पाहुणे चॅनेलच्या कार्यालयात येऊ लागलेत. त्यामुळं चॅनेलवाल्यांच्या यात्राही फारशा कुणाच्या लक्षात राहतील, असं वाटत नाही. प्रचाराच्या यंत्रणेचा प्रवास प्रत्येक निवडणुकीवेळी “मायक्रो टू मॅक्रो’ या क्रमानं होतो. ही अत्यंत चांगली आणि सर्वांच्याच दृष्टीनं सोयीची व्यवस्था आहे. राजकीय पक्षांना मुद्द्यांची रचना करणं आणि मतदाराला निर्णय घेणं सोपं करणारी ही व्यवस्था आहे. हेच पाहा ना, टीव्ही चॅनेलवाल्यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्या-त्या ठिकाणचे प्रश्‍न थेट जनतेकडून जाणून घेतले. “तुमच्या मतदारसंघात महत्त्वाच्या समस्या कोणत्या,’ असा पहिला प्रश्‍न असायचा. प्रत्येक मतदारसंघात या प्रश्‍नाचं उत्तर जवळजवळ सारखंच असतं, हे काळजीपूर्वक टीव्ही पाहणाऱ्याला नक्‍की समजू शकेल. पाणी, वीज, रस्ते, कचरा या शब्दांच्या पलीकडे समस्यांची मजल फारशी जात नाही. या शब्दांना स्थळाप्रमाणंच काळाचंही बंधन नाही. वर्षानुवर्षं देशाच्या कानाकोपऱ्यात याच समस्या सांगितल्या जात आहेत.

एकसारख्या समस्या अनेक ठिकाणी असणं एकवेळ समजून घेता येईल; पण प्रत्येक निवडणुकीत त्याच पुनःपुन्हा पुढे याव्यात, हे काही झेपत नाही. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज वगैरेची स्थिती बदलतच नसेल, तर आपण बदलतोय हे कसं मान्य करायचं? विकास होतोय म्हणजे नेमकं काय होतंय? प्राथमिक सुविधांची वानवा असण्याबरोबरच बेरोजगारी, शेतीचे प्रश्‍न, स्थलांतरं हे विषयसुद्धा पूर्वीपासून प्रत्येक निवडणुकीत चर्चिले जातायत. आता त्यात टोल, प्रदूषण, वृक्षतोड, अतिक्रमणं, नैसर्गिक आपत्ती, शहरातली बकाली, झोपडपट्ट्या वगैरे अनेक नव्या समस्यांची भरच पडलीय. निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात यावरील चर्चा उरकून घेतली जाते. सर्वसामान्यांचा आवाज प्रातिनिधिक स्वरूपात ऐकून घेतला जातो. त्याच वेळी विविध पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांकडे बोटं दाखवून मोकळे होतात.

समस्या कायम असण्याचं पाप नेमकं कुणाचं, हा विषय समस्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो. अखेरच्या टप्प्यात स्टार प्रचारक मात्र वेगळेच विषय घेऊन समोर येतात. सामान्यतः भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, घराणेशाही असे विषय या टप्प्यात जोर धरतात. वेगवेगळ्या अस्मिता उचल खातात. मानापमान, स्वाभिमान, प्रतिष्ठा अशा शब्दांची चलती सुरू होते. आता तो टप्पा सुरू झालाय. मोठ्या विषयांना वाचा फुटू लागलीय.

कधी-कधी मनात विचार येतो, या सगळ्या प्रक्रियेचा क्रम बरोबर उलटा असता, तर काय झालं असतं? म्हणजे पहिल्या टप्प्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू द्यायच्या आणि शेवटच्या टप्प्यात यात्रा काढायच्या. कदाचित विषयांचा प्राधान्यक्रमही बदलला असता. वर्षानुवर्षे न सुटलेल्या प्रश्‍नांना प्राधान्य मिळालं असतं. शिवाय, निवडणूक झाल्यानंतर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना “ताजा अभ्यास’ घेऊन विधिमंडळात आणि मतदारसंघात प्रवेश करता आला असता. बोला, हा फ्लॅशबॅक कुणाला रुचेल आणि पचेल?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)