फ्लेक्‍स, पोस्टर्समुळे दापोडीचे विद्रुपीकरण

कारवाईकडे कानाडोळा : बस थांबे, झाड, विजेच्या खांबांवर अतिक्रमण

पिंपळे गुरव – पथदिव्यांचे खांब, रस्ता दुभाजक, झाड एवढेच नव्हे तर उड्डाणपूल जेथे जागा मिळेल तेथे फ्लेक्‍स, पोस्टर्सच्या माध्यमातून फुकटच्या जाहिरातदारांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दापोडी परिसराला बकाल स्वरुप आले असून महापालिकेचा कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आज जागोजागी जाहिरातबाजी होताना दिसत आहे. कोणी कुठेही जागा भेटेल त्या ठिकाणी आपले पॅपलेट चिटकवून जातात. तसेच बेशिस्तपणे फलकांची उभारणी करतात. कुठेही फ्लेक्‍स लावतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. शिवाय वाहतुकीला देखील त्याचा मोठ्‌या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. गेल्यावर्षी तर मोशी आणि पुनावळेत फ्लेक्‍स अंगावर पडून दोघांचा त्यात बळी गेलेला आहे. तरी देखील याकडे दुर्लक्षच होत आहे. आणखीन मोठ्या प्रमाणात फ्लेक्‍स आणि जाहिरातीबाजी सुरुच आहे.

मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले फ्लेक्‍स पावसामुळे घडलेल्या घटना ताज्या आहेत. अशात दापोडी परिसरात शिवाजी महाराज पुतळा बस थांब्यावर जाहिरातदारीचे दुकानच उभे राहिलेले आहे. यामुळे पूर्ण बस स्थानकाचा रंग उडून गेलेला आहे. बसच्या वेळापत्रकावरच जाहिराती चिटकवतात. त्यामुळे प्रवाशांना वेळापत्रकच दिसत नाही. यामुळे बस थांब्याचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक भिंतीवर जाहिराती लावलेल्या आहेत. विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीवर देखील जाहिराती आहेत. एकीकडे आपण स्वच्छता अभियान राबविण्यात येत असताना शहरात असे प्रकार घडतात. या फ्लेक्‍स आणि जाहिरातीबाजीमुळे शहर विद्रुपीकरण होण्यास मदतच होत आहे.

या विद्रुपीकरण करणारऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील होत आहे. सर्वसामान्यांना नियमांचा धाक दाखवला जातो. मात्र, फुकट्‌या जाहिरातदारांकडून सार्वजनिक मिळकतींचे विद्रुपीकरण होत असताना त्यावर कारवाई का केली जात नाही. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दंड आकारणीत वाढ प्रस्तावित आहे. त्यामुळे वर्षानुवर्षाच्या बेशिस्त वाहतुकीला चाप लागेल. त्याच धर्तीवर अनधिकृत फ्लेक्‍स, होर्डिंग, बॅनर, पोस्टर्सवर कारवाईसाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.

– सचिन कोरे, महाविद्यालयीन विद्यार्थी 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.