फाजील विश्‍वास नडला

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी खऱ्या अर्थाने हक्काचा मानला जातो. झोपडपट्टीतील मतदार नेहमीच राष्ट्रवादीला साथ देत आला आहे. आजही सर्वाधिक राष्ट्रवादीचे नगररसेवक याच मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघाने राष्ट्रवादीच्या पार्थ यांना साथ न दिल्यामुळे हा हक्काचा मतदारसंघही राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे महायुती आणि आघाडीच्या उमेदवाराला पडलेल्या मतांवरून स्पष्ट झाले आहे. हा मतदारसंघही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या चुकांमुळेच हातातून निसटला आहे. महापालिका निवडणुकीपासून कोणाच्याही ध्यानात नसलेल्या नेत्यांच्या हाती निवडणुकीची सूत्रे दिल्यामुळे पार्थ यांना या मतदारसंघात 41 हजार 294 मतांची पिछाडी मिळाली.

माजी आमदार अण्णा बनसोडेही आपली जबाबदारी निभाविण्यात कमी पडल्याचेच निकालावरून पुढे आले आहे. ज्या चुका त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या चुकांची पुनरावृत्ती लोकसभेच्या निमित्ताने पहावयास मिळाली. झोपडपट्टीतील मतदारांना गृहित धरण्याची चूकही पवारांना महागात पडली. बारणे यांना या मतदारसंघात 1 लाख 3 हजार 232 मते पडली तर केवळ 61 हजार 941 मते पार्थ यांना पडली. पिंपरीतून राष्ट्रवादीने किमान 40 हजारांचे मताधिक्‍य घेणे अपेक्षित असताना तितक्‍याच मतांची पिछाडी धोक्‍याचे ठरणारे आहे. चुकांची पुनरावृत्ती टाळून विधानसभा निवडणुकीची तयारी न केल्यास हा मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या हातून जाणार हे निश्‍चित.

चिंचवड विधानसभेचा विचार केल्यास या मतदारसंघात महायुतीची ताकद असल्याचे सर्वमान्य आहे. मात्र ज्या लोकांनी आणि नेत्यांनी पवारांना महापालिकेतून हद्दपार केले ते नेते आतून रसद पुरवतील आणि आपल्या पुत्राला विजयी करतील अशी आशा अजित पवारांना होती. परंतु अशी कोणतीच रसद न मिळाल्याने चिंचवड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला तब्बल 96 हजार 758 मतांचे मताधिक्‍य मिळाले. ज्या लोकांनी यापूर्वीच महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला आणि पर्यायाने अजित पवारांना नामोहरम केले होते त्यांच्यावर ठेवलेला फाजील विश्‍वास नडल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे.

ज्या चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबाला होता त्या मतदारसंघात पार्थ यांना केवळ 79 हजार 717 मते मिळाली. महायुतीच्या बारणेंना तब्बल 1 लाख 76 हजार 475 मते मिळाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारामधील मतांमधील अंतर पाहता चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची विधानसभेसाठी डाळ शिजणे मुश्‍किल मानले जात आहे. त्यातच या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी निश्‍चित मानली जात आहे. भाजपाकडून आमदार लक्ष्मण जगताप यांनाच संधी मिळणार हे स्पष्ट असल्याने जगतापांना टक्कर देईल, असा उमेदवार राष्ट्रवादीला आतापासूनच शोधावा लागणार आहे. आयत्यावेळी केवळ निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणे आणि विजयाची गणिते बांधणे यापुढे शक्‍य नाही हे पार्थ यांच्या पराभवामुळे समोर आले आहे. या मतदारसंघात वंचितच्या राजाराम पाटील यांनीही 17 हजार 209 इतकी मते घेतल्याने वंचितच्याही अपेक्षा उंचावणार आहेत. पराभवातून सावरून राष्ट्रवादी चिंचवड विधानसभेत नियोजन करणार की पुढच्या पराभवाची बीजे पेरणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

मावळ – तगड्या लढतीची अपेक्षा

मावळ विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे तेवढी राष्ट्रवादीमध्ये एकी निर्माण झाल्याने या मतदारसंघात बारणे यांना केवळ 21 हजार 827 मतांचे मताधिक्‍य मिळाले. पार्थ यांना 83 हजार 445 मते तर बारणे यांना 1 लाख 5 हजार 272 मते मिळाली. मावळ मतदारसंघ गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात बारणे यांना चांगली आघाडी मिळेल, असे अपेक्षित असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यश आले. विधानसभेसाठी या पक्षाला या ठिकाणी काही प्रमाणात आशा असल्या तरी स्थानिक नेत्यांनी एकी राहणे शक्‍य नाही. त्यामुळे या ठिकाणीही विधानसभेला पुन्हा एकदा पराभवाचेच तोंड राष्ट्रवादीला पहावे लागणार की ही एकी कायम ठेवून भाजपाला या ठिकाणाहून पराभूत करण्यात यश मिळविणार ? हे येणाऱ्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.