ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी

सप्ताहाच्या मंडपात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याने केले होते हे कृत्य

पुणे: ज्ञानेश्‍वरी पारायण सप्ताहाच्या मंडपात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याने चाकुने पोटात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला, पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.सिरसीकर यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

आदिनाथ शंकर वाडकर (वय 39, रा. कोंढणपूर फाटा, बांडेवाडी, ता. हवेली, मूळ. ससेवाडी, ता. भोर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सर्जेराव भिकोबा गोगावले (वय 40, रा. ससेवाडी, ता. भोर) असे जखमी झालेल्याचे नाव असून, त्यांची पत्नी आशा (वय 38) यांनी याबाबत राजगड पोलिसात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी काम पाहिले. त्यांनी 12 साक्षीदार तपासले. त्यामध्ये तीन प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलीस निरीक्षक एस.बी.साळवे यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सचिन अडसुळ यांनी काम पाहिले.

ही घटना 27 एप्रिल 2014 रोजी दुपारी 2.20 च्या सुमारास ससेवाडी येथील विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरासमोरील मंडपात घडली. वाडकर याने ज्ञानेश्‍वरीच्या मंडपात गाडी लावली. ती सप्ताहाचे काम पाहणाऱ्या जखमी सर्जेराव यांनी काढण्यास सांगितली. त्यावेळी जागा तुझ्या बापाची आहे का, म्हणत त्यांच्या पोटात चाकुने वार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तिघांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. मच्छिंद्र गटे यांनी केली. न्यायालयाने वाडकर याला शिक्षा सुनावली. तर, दोघांची निर्दोष मुक्तता केली.

Leave A Reply

Your email address will not be published.