Nashik Accident : नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. वडील मोबाईलमध्ये पाहण्यात व्यस्त असतानाच एक पाच वर्षाचा मुलगा कारखाली आल्याने चिरडला गेला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ही दुर्देवी घटना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या पार्कींगमध्ये घडली आहे. ध्रुव अजित राजपूत असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचा नाव आहे. हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून वडिलांसोबत परत जात असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
मयत चिमुरड्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदाला हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्याठी घेऊन आले होते. मात्र खेळून झाल्यानंतर घराकडे जात असताना अजित यांचं लक्ष मोबाईलमध्ये होते. त्याचवेळी अजित यांचे लक्ष मोबाईलमध्ये होते. तेवढ्याच ध्रुव हा वडिलांचा हात सोडून लॉबीत धावत आला. त्याचवेळी एका ईनोव्हा गाडीने त्याला चिरडलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, अंगावरून गाडी गेल्यानंतर ध्रुवला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी चारचाकी वाहन चालकाच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल…
या व्हिडीओमध्ये ध्रुव हा पळत येताना दिसत आहे. त्याने गाडी दिसल्यानंतर स्वत:ला थांबण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो घसरला आणि गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकासमोरच पडला. ते चाक त्याच्या अंगावरुन गेलं. मुलाच्या अंगावरुन कार गेल्याचं लक्षात येताच अजित यांना धक्काच बसला. त्यांना मुलाला उचलले. काही क्षणांमध्ये घटनास्थळावर लोकांची गर्दी झाली. ध्रुव बेशुद्ध झाल्यासारखा निपचित झाल्याने अजित चांगलेच संतापले. दरम्यान या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इनोव्हाच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याचंही दिसत आहे.