दुर्दैवी : ‘लिफ्ट’मध्ये अडकडून चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई  – मुंबईत लिफ्टमध्ये अडकून एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना धारावीत घडली आहे. लाकडी दरवाजा आणि बाहेरच्या ग्रीलमध्ये अडकल्याने त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

मोहम्मद हुजैफा शेख असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. धारावीतील पालवाडीच्या कोजी शेल्टर इमारतीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, मोहम्मद हुजैफा शेख हा पाच वर्षीय मुलगा आपल्या लहान भाऊ-बहिणीसह लिफ्टमधून चालला होता.

दरम्यान, तो लिफ्टचा लाकडी दरवाजा आणि बाहेरच्या ग्रीलमध्ये अडकला. त्याच्या भावंडांनी लिफ्टमधील बटन दाबल्याने मोहम्मद अडकलेला असतानाच लिफ्ट वरच्या मजल्याकडे निघाली.

या घटनेत त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. यानंतर मोहम्मदला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.