शबरीमला : शबरीमला तीर्थयात्रेला केरळात सुरवात झाली. या तीर्थयात्रेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या यात्रेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ महिलांकडे वयाचा पुरावा मागण्यात येत आहे. तो नसलेल्यांना पांभा येथील तळावर रोखून धरण्यात येत आहे.
शनिवारी दुपारी पाच वाजता या मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात येतील. या मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा इशारा काही महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे. सुमारे पाच महिलांना पहिल्या दिवशी दर्शनाला जाण्यात मज्जाव करण्यात आला. 10 ते 50 वयोगटातील महिलांना कोणत्याही स्थितीत दर्शनासाठी सोडू नये असा आम्हाल सक्त आदेश आहे, असे बंदोबस्तावरील पोलिसांनी सांगितले.
सरकारने महिला भक्तांना संरक्षण पुरवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तरीही काही महिला कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी जाणार असल्याच्या भुमिकेवर ठाम राहिल्या आहेत. सुमारे 10 हजार भाविकांनी पोलिस चेक पोस्ट दुपारी एक वाजेपर्यमत ओलांडली होती, असे पोलिसांनी सांगितले.
कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणीही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याता येईल, असे जिल्हाधिकारी एम. नुहू यांनी सांगितले.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, आणि चेन्नईच्या मानीती संघाच्या कार्यकर्त्यांसह 45 भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या मुद्द्यावर सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. भाविकांच्या भावनांशी खेळू नये, असे आवाहन केले आहे. याबाबत वाट पाहून सर्वोच्च न्यायलायच्या निकालाबाबत स्पष्टता येऊ द्यावी, असे म्हटले आहे.