मंचर, (प्रतिनिधी) – येथील शरद सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने सभासदांना दहा टक्के लाभांश सभासदांच्या खात्यात थेट वर्ग केले आहे. बँकेचा पुढील तीन वर्षांत एकूण 5 हजार कोटी रुपयेपर्यंतचा व्यवसाय व 50 शाखा पूर्ण करण्याचा मानस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहे, अशी माहिती शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.
मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या आर्थिक प्रगतीबाबत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शहा बोलत होते.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, संचालक दत्ता थोरात, सुषमा शिंदे, दौलत लोखंडे, के. के. सैद, अशोक आदक पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. चालू वर्षी शरद सहकारी बँकेस 51 वर्ष पूर्ण झाले आहे.
बँकेने या वेळी एनपीएचे प्रमाण 3.48 एवढे असून बँकेने सभासदांना दहा टक्के लाभांश दिला असल्याचे शहा यांनी सांगितले.
28 हजार सभासदांना चार कोटींपेक्षा जास्त लाभांश दिला आहे. येत्या मार्चमध्ये एनपीए झीरो ते एक टक्क्यांवर येईल. पुढील वर्षी पाच ते सहा शाखा नवीन सुरू होणार आहे.
शरद सहकारी बँकेची सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांना आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने बँकेचे कामकाज सुरू आहे. सप्टेंबर 2024 अखेर बँकेने 2 हजार 857 कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे.
यामध्ये एकूण ठेवी1 हजार 698 कोटी रुपये, कर्जवाटप 1 हजार 158 कोटी रुपये, नफा 1 कोटी 12 लाख रुपये आहे. बँकेचे वसुल भाग भांडवल 48 कोटी 34 लाख रुपये असून एकूण निधी 193 कोटी 37 लाख रुपये व खेळते भांडवल 1 हजार 956 कोटी 80 लाख रुपये आहे,
तसेच निव्वळ संपत्ती 121 कोटी रुपये असून, प्रतिसेवक व्यवसाय 1031.55 कोटी आहे. आपल्या भागातील 300 ते 350 युवक-युवतींना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच ठेवींमध्ये नव्याने 300 ते 350 कोटी रुपये वाढ होईल व 450 कोटी रुपये ते 500 कोटी रुपये नवीन कर्ज वाटप होईल व सुमारे 1500 नवीन कर्जदारांना त्याचा लाभ होईल.
बँकेने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत 1508 महिला खातेदारांच्या बचत खात्यांमध्ये 70 लाख जमा केले आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बँकेची वाटचाल चालू आहे.
तसेच बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख व त्यांच सहकारी सेवक यांनी समाजाची बांधिलकी जपत सर्व ग्राहकांना तत्पर व विनम्र सेवा देण्याचा अविरत प्रयत्न करून हा यशाचा टप्पा बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्षात गाठला आहे.
जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन, त्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे संचालक मंडळाने सांगितले.