-->

पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना लांबली कॉंग्रेस अध्यक्ष निवड

नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेस पक्षातील अध्यक्षपदासाठीची धुसफूस थांबण्याचं नाव घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे  काँग्रेसच्या अंतरिम पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच असतील. कॉंग्रेसला येत्या जून महिन्यात नवीन अध्यक्ष मिळेल अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी कार्यकारीणीच्या बैठकीनंतर दिली., शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली.

पक्षातील निवडणूका कधी घ्यायच्या या मुद्‌द्‌यावरून पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन गट पडले होते असे सांगितले जाते. एक गट ही निवडणूक त्वरीत घ्या अशी मागणी करीत होता, तर दुसऱ्या गटाने पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणूकीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी सुचना केली. अखेरीस जून महिन्यात नवीन अध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला आहे असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

तत्पुर्वी कॉंग्रेस पक्षाच्या निवडणूक निर्णय समितीने पक्षाच्या अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रमाविषयी येत्या 29 मे रोजी पक्षाच्या नवीन अध्यक्षांसाठीची निवडणूक घ्यावी असा प्रस्ताव सुचवला होता. या प्रस्तावावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर विस्तृत चर्चा झाली.

यावेळी अभा कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांन पक्षाच्या निवडणूक समितीने पाठवलेला प्रस्ताव वाचून दाखवला. मधुसूदन मिस्त्री हे निवडणूक समितीचे प्रमुख आहेत. त्यांनी कॉंग्रेस महासमितीचे आधिवेशन घेऊन 29 मे रोजी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली जावी अशी शिफारस पक्षाला केली होती.

कॉंग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाला आलेल्या अपयशाची जबबादारी स्वीकारून मे 2019 मध्ये पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली होती. तथापि त्यांना प्रकृती व वयाच्या कारणामुळे फार ऍक्‍टिव्ह राहता आले नाही. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसला पूर्ण वेळ व ऍक्‍टिव्ह अध्यक्ष असला पाहिजे असे पत्र कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पाठवले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.