नवी दिल्ली – दिल्लीतील प्रख्यात पंचतारांकित हॉटेल असलेले हॉटेल ताज मानसिंग आता करोना उपचाराचे केंद्र म्हणून रुपांतरीत करण्यात आले आहे. हे हॉटेल सर गंगाराम हॉस्पिटलला जोडले गेले असून तेथील करोनाचे रुग्ण या हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात येतील. या रुग्णांच्या मदतीसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.
तथापि, या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णाला प्रतिदिन पाच हजार रुपये खोली भाडे म्हणून आणि पाच हजार रुपये वैद्यकीय उपचार खर्च म्हणून भरावे लागणार आहेत. या पाच हजार उपचार खर्चात हॉटेलमधील चहा जेवणाच्या खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. येथे दाखल झालेल्या रुग्णाला ऑक्सिजन द्यायची वेळ आली तर त्यासाठीही दोन हजार रुपये स्वतंत्र आकारले जाणार आहेत. गंगाराम रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांनाही येथील खोल्या वापरता येतील पण त्याचा खर्चही हॉस्पिटलने या हॉटेलला भरायचा आहे.
शहरांतील रुग्णालयांमध्ये बेड्स कमी उपलब्ध असल्याने आता दिल्ली सरकारने हॉटेल्सच्या खोल्याही वापरण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ताज मानसिंग हे करोना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. दिल्लीत जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत करोनाचे सुमारे साडे पाच लाख रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावेळी दिल्लीत 88 हजार अतिरीक्त खाटांची गरज भासणार आहे.