अमेरिकेचा इराणवर संशय
वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव काही मिटण्याचे नाव घेत नाहीत. कारण, इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पाच रॉकेट हल्ले झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री हे हल्ले झाले असून त्यामागे इराणचा हात असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. अद्याप कोणीही याची जबाबदारी घेतलेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बगदादमधील ग्रीन जोन येथील अमेरिकी दुतावासाजवळ दोन रॉकेटद्वारे हल्ला करण्यात आला होता. ग्रीन जोन हा भाग मध्य बगदादमध्ये आहे. या ठिकाणी सरकारी इमारती आणि विविध देशांचे राजकीय दुतावास आहेत. इराणच्या सैन्याचे मुख्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांद्वारे ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिका याच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
दुसरीकडे बगदादमध्ये इराकी सरकारविरोधातील असंतोष शमण्याची चिन्हे नाहीत. इथल्या सरकारची कामाची पद्धत तसेच अमेरिकेचे सैन्य बऱ्याच काळापासून देशात ठाण मांडून बसल्याने अनेक आठवड्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनांमुळे इराकमध्ये सध्या मोठे तणावाचे वातावरण आहे.