येरवडा(प्रतिनिधी) – येरवडा तात्पुरत्या कारागृहातून मोक्यासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपीनी गुरुवारी पहाटे खिडकीचे गज कापून पलायन केल्याची घटना घडली. येरवडा तात्पुरत्या कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही चौथी घटना आहे.
देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश आजिनाथ चव्हाण( दोघेही रा. बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे), अक्षय कोडक्या चव्हाण, (रा. लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे), अजिंक्य उत्तम कांबळे (रा. सहकार नगर टिळेकर वाडी), सनी टायरन पिंटो(रा. काळेवाडी पेट्रोल पंपाच्या मागे, पुणे) यात गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे .
पलायन केलेल्या या आरोपींमध्ये देवगन, गणेश, अक्षय हे तीनही आरोपी दौंड पोलिसांनी मोक्याच्या पुण्यात अटक केलेले आहेत. अजिंक्य याच्यावर लोणीकाळभोर तर सनी पिंटो याच्यावर वाकड पोलिस स्टेशन येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयाच्या आवारातील तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक चारच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ५ मधील खिड़कीचे दोन गज उचकटून पाच आरोपी पळून गेल्याचा प्रकार बंदोबस्तावरील पोलिसांच्या लक्षात आला. याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु.टी. पवार, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हा निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी भेट दिली.
याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून अधिक तपास येरवडा पोलिस करीत आहेत.