नेवासे (प्रतिनिधी) – नगर – औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यानजीक झालेल्या स्विप्ट कार व ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात स्विप्ट कारचा चक्काचूर झाला. हा अपघात सोमवारी (दि.22) पहाटे दोन वाजेच्या दरम्यान घडला.
या अपघाताबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवारी रात्री 2 च्या सुमारास अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच 19 वाय 7123) व औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विप्ट कार (क्रमांक एमएच 21 बीएफ 7178) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहे.
मयत जालना जिल्ह्यातील मंठा येथील असल्याचे समजते. स्वीप्ट कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस घुसल्याने स्वीप्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक अशोक नागरगोजे, पोलीस नाईक बबन तमनर, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुर्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले. जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलविले. मात्र, सर्व जखमी उपचारापूर्वीच मयत झाले असून पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहेत.