वणवा लावल्याप्रकरणी पाच जणांना शिक्षा

मेणवली  – चांदक, पसरणी, सिद्धनाथवाडी, कणूर येथील वनविभागाच्या हद्दीतील वनक्षेत्रास वणवा लावण्यात आला होता. वनकर्मचाऱ्यांनी वेळीच हा वणवा आटोक्‍यात आणला. दरम्यान, याप्रकरणी वनविभागाने पाचजणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता एकास दोन हजार रुपये तर चौघांना प्रत्येकी 3 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद सुनावण्यात आली.
वनक्षेत्रास वणवा लावल्याप्रकरणी गेणू बापू सावंत (रा. चांदक), गणेश नामदेव खरात व भूषण शंकर जगदाळे (दोघेही राहणार सिद्धनाथवाडी, वाई), शालन नामदेव पवार (रा. पसरणी), पुष्पा शिवाजी राजपुरे व बळीराम शंकर चव्हाण (रा. कणूर) यांच्यावर वनअधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

साताऱ्याचे उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, सहाय्यक वनसंरक्षक भडाळे, वाईचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वनपाल सदानंद शंकर राजापुरे, प्रभारी वनपाल सुरेश कुंडलिक सूर्यवंशी, वनरक्षक वैभव अशोक शिंदे, वनरक्षक वसंत गवारी, रामचंद्र भिसे, अशोक सूर्यवंशी, गणेश कानडे यांनी ही कारवाई केली. 20 रोजी सर्व आरोपिंना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता बळीराम शंकर चव्हाण यास दोन हजार तर इतर चार आरोपींना तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधी कैदेची शिक्षा ठोठावली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.