भिंत अंगावर कोसळून पाच जण जखमी

संगमनेरात वादळी वाऱ्याने उडाले घरांवरील पत्रे ; अनेकांचा संसार आला उघड्यावर

संगमनेर: संगमनेर तालुक्‍यातील नागरिक प्रचंड उष्म्याने हैराण झालेले असताना शनिवारी सायंकाळी अचानक विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली. अचानक आलेल्या वादळात पठार भागातील मांडवे बु. शिंदोडी येथील घरांचे पत्रे उडून जाऊन घराची भिंत कोसळून पाच जण जखमी झाले आहेत.

संगमनेर शहरासह पठारभागात शनिवारी सायंकाळी सातनंतर विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने प्रचंड धुळीचे वादळ घोंघावले. सुमारे अर्धा-पाऊणतास चाललेल्या अस्मानी संकटात सारे संगमनेरच धुळीने व्यापले होते. वाऱ्याचा वेगही जोराचा असल्याने सर्वाधिक परिणाम मांडवे बु. शिंदोडी परिसरात झाला. मांडवे बु. येथे रात्री साडेदहाच्या सुमारास आदिवासी भिल्लवस्तीवर अचानक वादळी वाऱ्याने हाहाकार घातल्याने पवार कुटुंबाचे राहात्या घराचे पत्रेच उडून गेले. घराची भिंत कोसळून भुईसपाट झाले. यावेळी पवार कुटुंबातील सदस्य घरात झोपले होते.

झोपेत असताना अचानक घराचे पत्रे उडून जाऊन घराची भिंतच आतल्या बाजूला पडल्याने बाळू भानुदास पवार, विमल बाळू पवार, झुंबरबाई भानुदास पवार, अजित श्रावण पवार, करण बाळू पवार भिंतीखाली गाडले जाऊन जखमी झाले. त्यांना वेळीच सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तत्काळ त्यांना साकुर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल आले. पवार कुटुंबांचे राहाते घर पूर्णपणे उद्‌द्‌धस्त झाल्याने राहायला घरच नसल्याने बेघर झाल्याने संसार उघड्यावर आला आहे. घरातील संसारोपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, मांडवे परिसरातील शंकर पाराजी धुळगंड यांच्या राहत्या घराच्या पडवीचे पत्रे उडून गेले, तर लिंब फाट्याजवळील हनीम गुलाब सय्यद यांची दुकानाची टपरी उडून गेली. कुसुम अंतुन बागूल यांच्या राहात्या घराचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. नाना किसन उपाम यांच्या टपरीचे पत्रे उडाले. काळू सीताराम उमाप यांच्या राहत्या घरावर लिंबाची फांदी पडल्याने नुकसान झाले. कुटे फार्म हाऊस जवळ झाडे पडली आहे. तसेच शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टचे संत निवासाच्या पडवीचे पत्रे, पाण्याची टाकी उडून गेली. शौचालयाचे दरवाजे तुटून नुकसान झाले. शिंदोडी रोडवर असलेले रूपेश धुळगंड यांच्या मालकीच्या पोल्ट्रीचे पत्रे उडून गेले, तर शेळी फार्मचे कपांउड तुटून गेल्याने मोठे नुकसान झाले. ऐन दुष्काळात उघडल्यावर आलेल्या बेघरांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेचे माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे यांनी केली आहे. तलाठी गणेश शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.