बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद
बारामती – गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील तांदूळवाडी येथे बुधवारी (दि. 8) घडला. यात सामील असलेल्या महिलेसह पाचजणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 34 वर्षीय पीडित विवाहितेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार रेश्मा अमोल भुजबळ, अमोल बबन भुजबळ (दोघे रा. तांदूळवाडी ता. बारामती) या पती-पत्नींसह चेतन मोरे, काका जोगदंड व एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्मा अमोल भुजबळ यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने पीडित विवाहितेला रेश्मा हिने वाढदिवसानिमित्त घरी बोलावले होते.
वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर रेश्मा हिने शीतपेयात गुंगीचे औषध घालून दिले, त्यानंतर पीडित महिला झोपी गेली. सकाळी उठल्यानंतर ती विवस्त्र अवस्थेत होती. तिच्याशेजारी चेतन मोरे नावाची व्यक्ती होती. त्याने पीडितेवर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने रेश्मा हिच्याकडे विचारणा केली असता चेतन मोरे माझा जीव की प्राण आहे, असे उत्तर मिळाले. त्यानंतरही महिलेस शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर काका जोगदंड यांना फोनवरून बोलविले. जोगदंड याने पीडितेशी जबरदस्ती केली. त्यानंतर 30 ते 35 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. यानंतर रेश्मा हिने पीडितेकडून 10 हजार रुपये घेऊन हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.