पुणे -करोना संसर्गानंतर आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे 335 रुग्ण सापडले असून, त्यातील 34 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 10 मृत्यू पिंपरी-चिंचवड हद्दीत आहेत. दरम्यान, पुणे शहरात या आजाराचे आतापर्यंत 150 रुग्ण आढळले आहेत. तर, गेल्या आठवड्यात नवीन 37 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
करोनातून बरे झालेल्या पण, प्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण होत आहे. विशेषत: ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्यांना हा संसर्ग होत आहे.
शहरात आढळलेल्या 150 पैकी 102 जणांवर आतापर्यंत शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
सध्या 101 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 5 महापालिकेच्या, तर 96 रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर, महापालिकेच्या रुग्णालयातून 2, आणि 44 जण खासगी रुग्णालयांतूनबरे झाले आहेत.
यातील 102 जणांवर आतापर्यंत शस्त्रक्रिया करावी लागली आहे. तर, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या पाहिली असता, हा आकडा 335 वर गेला आहे. त्यातील 216 जणांनी म्युकरमायकोसिसवर मात केली आहे.
संसर्गजन्य नाही – डॉ. लहाने
म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. यापूर्वीही म्युकरमायकोसिस हा आजार होता, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले. म्युकर जमिनीतून आपल्या शरीरात जातो. पण तो हवेतून पसरतो असे म्हणता येणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही, असे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.