भिंत दुर्घटनाप्रकरणी पाच जणांची समिती

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी देणार

पुणे  –“सीमाभिंत दुर्घटनाप्रकरणी सकृतदर्शनी दोषी कोण आहेत, याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी देणार आहेत. तो प्राप्त झाला, की लगेचच याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येईल. तसेच, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून सुमारे आठ दिवसांमध्ये त्याचा अहवाल प्राप्त होणार असून पाच सदस्यांची ही समिती असेल,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात दिली.

या चौकशी समितीत महापालिका, पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील. पाटील यांनी कोंढवा येथील दुर्घटनेच्या ठिकाणी दुपारी भेट देत पाहणी केली. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्‍ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, महापालिका आयुक्‍त सौरभ राव आदी उपस्थित होते. या प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल तसेच तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक प्रशासनासह जखमी कामगार, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित इमारतीतील नागरिकांशी पाटील यांनी संवाद साधला.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय आपत्कालिन मदत निधीतून प्रत्येकी 4 लाख रुपये आणि कामगार कल्याण निधी विमा योजनेतून एक लाख, असे प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली असून त्यापैकी काही

नातेवाईकांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.
जखमी कामगारांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, मृत कामगारांचे पार्थिव त्यांच्या बिहारमधील गावांमध्ये पाठविण्याबाबत तेथील प्रशासनाची संपर्क करण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितली. या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक कारवाई करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

कोंढव्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन मी परिस्थितीची पाहणी केली.यामध्ये बळी पडलेल्या कुटुंबांच्या सदस्यांना भेटून त्यांना धीर दिला. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून याबाबतचा अहवाल चोवीस तासांत सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्यात येईल.

– गिरीश बापट, खासदार, पुणे

कोंढव्यातील घटनेबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करते. या प्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सरकारकडून मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, तसेच या घटनेतील जे-जे दोषी असतील, त्यांची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल.
– डॉ. नीलम गोऱ्हे
उपसभापती, विधानपरिषद

Leave A Reply

Your email address will not be published.