अलाप्पुझा – केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यात वैद्यकीयचे शिक्षण घेत असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या काही वेळापूर्वी या विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांशी आणि वसतीगृहातील सहकाऱ्यांशी चर्चा झाली होती.
अपघाताच्या या बातमीमुळे या सगळ्यांना जबर धक्का बसला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने त्याच्या मित्राला चित्रपट पाहायला जात असल्याचे सांगितले होते. अलप्पुझा येथील वंदनम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी सोमवारी रात्री भाड्याच्या कारमधून प्रवास करत होते.
दरम्यान, त्यांची कार अचानक केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला धडकल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कन्नूरचा मोहम्मद अब्दुल जब्बार, लक्षद्वीपचा मोहम्मद इब्राहिम, मलप्पुरमचा आयुष शाजी आणि पलक्कडचा श्रीदीप अशी मृतांची ओळख पटली आहे.
स्थानिक लोकांनी सांगितले की, 3 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेमुळे कारचे पूर्ण नुकसान झाले असून ती कापून त्यातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.