राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेसाठी फलटण पालिकेचे पाच लाख

फलटण –  विरोधी पक्षाने विरोध करीत दिलेली उपसूचना नगराध्यक्षांनी मतदानासाठी टाकल्यावर
फलटण नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय शालेय खो- खो स्पर्धेला पाच लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला.

पालिकेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात दोन विषयांसाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नीताताई नेवसे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी अजय माळवे यांनी केलेल्या सूचनेनुसार महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पहिला विषय नगरपालिकेच्या शेजारीच असणाऱ्या राजधानी टॉवरच्या उर्वरित कामासाठी तसेच सि. स. नंबर 3321 मधील दुकान गाळ्याच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्याचा होता. चर्चा होऊन या विषयाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

दुसरा विषय क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांचे संयुक्त विद्यमाने 2 फेब्रुवारी ते 5 दरम्यान होणाऱ्या 65 व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोशिएशनने मागणी केलेल्या पाच लाख रुपयांच्या निधीच्या मंजुरीचा होता. विरोधी पक्षाचे गटनेते अशोकराव जाधव यांनी यास विरोध करुन आयोजन समितीमध्ये नगरपालिकेचा उल्लेख नसून निधी देण्यास विरोध करणारी उपसूचना मांडली. नगराध्यक्षा नीताताई नेवसे यांनी ही उपसूचना बहुमताने फेटाळण्यात येत असल्याचे जाहीर केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.