जळगाव – जिल्ह्यातील भुसावळ शहर रविवारी रात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबाराने चांगलेच हादरले. भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर 3 जणांनी अंदाधुंद गोळीबार केला, या घटनेत रवींद्र खरात (वय ५०) यांच्यासह त्यांचा भाऊ सुनील बाबूराव खरात (वय ५५) मुलगा सागर रवींद्र खरात (वय २४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०), सुमित गजरे हे पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रवींद्र खरात हे भुसावळमधील समतानगरमध्ये राहतात. रविवारी रात्री पावणे दहा वाजता 3 हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात आणि सुमित गजरे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
या हल्ल्यात रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एकजण असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने भुसावळ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यात हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.