Pune Ganesh Visarjan 2024 | गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन पूर्ण झाले आहे. आता काही वेळातच मानाच्या गणपतीच्या मिरवणुकींना सुरुवात होणार आहे. तर दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन साधारण संध्याकाळी ४ वाजता करण्याचं नियोजन करण्यात आले आहे.
लाडक्या गणरायाला वाजतगाजत आणि दिमाखदार मिरवणुकीने निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मानाच्या गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीसाठी आकर्षक रथ, पालख्या सज्ज झाल्या आहेत. अनंत चतुर्दशीला मंगळवारी सकाळी १०.३० वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. सर्वप्रथम मानाचे पाच गणपती लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ होतील.
मानाचा पहिला ग्रामदैवत श्री कसबा गणपती
कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून निघणार आहे. सकाळी १०.३० वाजता आरती झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणूक मार्गस्थ होणार आहे.
मानाचा दुसरा ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून काढण्यात येणार आहे.
मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती
‘सूर्य’ रथातून श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. रांगोळीच्या पायघड्या आणि गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरुवात होणार आहे.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
तुळशीबाग गणपती मंडळाच्या गणेशाची मिरवणूक ३२ फूट उंची असलेल्या आणि आकर्षक फुलांनी सजवलेल्या ‘जगन्नाथ पुरी’ रथातून काढण्यात येणार आहे. जगन्नाथ रथाप्रमाणे कार्यकर्ते हा रथ ओढणार आहे.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
फुलांनी सजविलेल्या पालखीत केसरीवाडा गणपती मंडळाचे गणराय विराजमान होणार आहेत. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला ‘माऊली’ रथ मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
आकर्षक विद्युत रोषणाई असलेल्या श्री उमांगमलज रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होणार आहेत. जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली भगवान शंकराची मूर्ती, त्याच्या बाजूला त्रिशूळ व डमरू आणि कळस म्हणून मोठा रुद्राक्ष असणार आहे. यंदा सायंकाळी चार वाजता मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या मयूरपंख रथामधून निघणार आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल.