पाटणमधील खालचे आंबेघर येथे डोंगर कोसळून पाच कुटुंबे गाडली गेल्याची भीती

पाटण (प्रतिनिधी) – पाटण तालुक्यातील मोरगिरी विभागातील मोरणा- गुरेघर धरणाजवळच्या खालचे आंबेघर या गावावर डोंगर कोसळून पाच कुटुंबे दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

एकूण दहा कुटुंबे असणाऱ्या या गावावर शोककळा पसरली असून पहाटे अडीच ते तीन वाजता ही भयावह घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील माळीण गावच्या घटनेची पुनरावृत्ती पाटण तालुक्यात पाहण्यास मिळाली. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.

मोरगिरी विभागातील मोरणा- गुरेघर धरणाच्या बाजूला असणाऱ्या खालचे आंबेघर या गावावर पहाटे तीन वाजता गावाच्या वरील बाजूस असणारा डोंगर कोसळून सात कुटुंबे डोंगराखाली गाडली गेली.

इतर दोन कुटुंबांना बाहेर काढण्यात गोकुळ ग्रामस्थांना यश आले. या गावात एकूण दहा कुटुंबे वास्तव्यास होती, अशी माहिती ग्रामस्थांनी सांगितली. यातील अद्यापही पाच कुटुंबे ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

बचाव व मदत करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या ठिकाणी हे गाव असल्याने या ठिकाणी जायला रस्ता नाही. केवळ पायवाट असल्याने सध्या मदत व बचाव कार्यासाठी ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत आहेत.

सध्या ग्रामस्थांनी अनेक लोकांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढले आहे. मात्र अद्यापही दहा ते पंधरा जण ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा

पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. तर कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नदी, नाले, ओढे यांना महापूर आला आहे. तर डोंगरदऱ्यात वसलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे असते.

मात्र, पाटण तहसील कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन सध्या वाऱ्यावर असून याचा पुरता बोजवारा उडाला आहे. तहसीलदारांना या बाबींचे गांभीर्य नाही. खालचे आंबेकर येथील घटना पहाटे तीन वाजता घडली असताना तहसीलदार मात्र नऊ वाजता त्या ठिकाणी गेले आहेत. यावरून पाटण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाला किती गांभीर्य आहे हे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.