अभिवादन: पंचतत्त्वांतच आहे सुखाचा मार्ग

सौ. लीला शहा, डोंबिवली

आज जगभर युद्ध, कलह, हत्या, बलात्कार, सत्ता संघर्ष, वर्ण, वंश, जातीवरून युद्ध, अतिरेकी, अणुयुद्धाचं भय, भ्रष्टाचार, चोऱ्या, डाके, चंगळवाद, वाईट मार्गाने पैसा, धन संचय करणे या गोष्टींमुळे सामान्य माणूस गांगरून गेला आहे, भयभीत झाला आहे. अशावेळी महावीरांच्या अहिंसा, सत्य, अचौर्य, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पाच तत्त्वांची जपणूक केली तरी सुखाचा मार्ग सापडेल. समाज भयमुक्‍त होईल. आज अनेक विचारवंत, तत्त्वचिंतक, आध्यात्मिक संत हेच सांगतात. त्या दृष्टीने पाऊल टाकायला आपण सुरुवात करायला हरकत नाही. त्यात आपलंच हित आहे.

क्रांतीचं युग

इ. स. पूर्वीचं सहावं शतक म्हणजे दोन हजार सहाशे वर्षांपूर्वीचा काळ. या शतकाला क्रांतीचं युग म्हटलं जातं. भारतातच नव्हे, तर साऱ्या जगात क्रांतीचे, नव्या विचारांचे वारे वाहत होते. चीनमध्ये लोओ-त्से व कन्फ्युशस, ग्रीसमध्ये सॉक्रेटिस व प्लेटो, इराणमध्ये झरत्रुष्ट आणि भारतात महावीर आणि गौतम बुद्ध यांनी खूप मोठी क्रांती केली.

इ. स. पूर्व 599 मध्ये महावीरांचा जन्म झाला तेव्हा भारताची समस्या आर्थिक नव्हतीच, ना अन्न-वस्त्रांची कमी होती; पण अनाचार वाढला होता. “शील’ धर्माचा लोप झाला होता. शरीरसुख आणि सांसारिक सुख, सत्ता संघर्ष यांसाठी घोर अनर्थ होत होते. गरीब, दीन, दुबळे, शूद्र यांच्यावर अनन्वित अत्याचार होत होते. स्त्रिया केवळ उपभोगाची वस्तू, दासी म्हणून तिचा विक्रय चालला होता. पुण्यलाभ व्हावा यातून हजारो पशुबळी दिले जात होते. समृद्धीचं प्रदर्शन करण्यासाठी 100 घोड्यांचा अश्‍वमेध यज्ञ, तर कुणी 500 गायींचा यज्ञ करीत होते. कधी कधी नरमेध (माणसांचा यज्ञ) ही होत असे. यात हजारो पशू, प्राणी, माणसं बळी दिली जात होती. पशुबळीचे प्रमुख केंद्र उज्जैन होतं. निरपराध पशूंच्या रक्‍तानं नदीचं पाणीही लाल झालं होतं, असा उल्लेख “मेघदूता’मध्ये कालिदासानं केलेला आहे.

विविध तत्त्वज्ञानाच्या अनुयायांत लोक-परलोक, आत्म्याचे-ईश्‍वराचे अस्तित्व, देवानं केलेली निर्मिती पुनर्जन्म, स्वर्ग, मोक्ष इत्यादी अनेक बाबतीत तीव्र मतभेद होते. आत्मोन्नतीचा- मोक्ष प्राप्तीचा अधिकार फक्‍त उच्च वर्णातील माणसालाच आहे, स्त्रीलासुद्धा तो अधिकार नाही, असं ठामपणे म्हटलं जात होतं. अशा वेळी महावीरांचा जन्म झाला. वैशाली नगरीजवळील कुंडलपूरमध्ये शालूवंशिय क्षत्रिय राजा सिद्धार्थ व राणी त्रिशलेच्या पोटी हा महामानव जन्मला. सुखाची, उपभोगाची अनेक साधनं भगवान महावीरांच्या हातापायाशी होती; पण आजूबाजूची भयावह स्थिती, पशूंच्या अतिव किंकाळ्या, स्त्रियांचा आक्रोश ऐकून या महामानवाचं कोमल मन द्रवून गेलं. भोवताली इतकी दु:ख असताना मला सुखात राहण्याचा अधिकार नाही. या सर्व दु:खाची कारणं मला शोधलीच पाहिजेत, तोपर्यंत मी सुखानं जगूू शकणार नाही, असं म्हणत त्यांनी सर्वस्वाचा अगदी वस्त्रांचाही त्याग केला अणि दिगंबर दीक्षा घेऊन ते तप करण्यासाठी वनात निघून गेले. ज्या सुखासाठी, उपभोगासाठी माणूस धडपडतो, कष्ट करतो, लढतो ती सर्व सुखं पायाशी असून, ती सहज सोडून हा राजपुत्र तप करायला गेला.

चैतन्याचा आदर करा बारा वर्षे अव्याहत तप करून त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. जगातल्या दु:खाची कारणे आणि त्यावर उपाय त्यांना सापडला. गावोगावी विहार करून आपल्या ऋजू उपदेशानं तर्कसंगत-तर्कशुद्ध विचार पद्धतीनं त्यांनी लोकांची मनं जिंकून घेतली. मी म्हणतो म्हणून ऐकू नका, तुम्ही विचार करा आणि ठरवा, असं ते म्हणत. अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे. तुम्हाला जसे जगावे वाटते तसे प्रत्येक जिवाला अगदी कीडा-मुंगीलाही, तसेच वाघ-सिंहानांही जगण्याचा हक्क आहे. (आज पर्यावरणवादी म्हणतात, जीव साखळीतला एखादा दुवाही नष्ट करू नका, अन्यथा पर्यावरणाचा तोल ढळेल.) सृष्टीमध्ये जे जे चेतन आहे त्याचा आदर करा, त्याचा विचार करा, जगा आणि जगू द्या.
दुसरी गोष्ट त्यांनी केली ती वर्णाश्रमाची दुष्ट प्रथा थांबवण्याची. माणूस जन्माने कुणीही असला तरी तो आपल्या कर्माने कार्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य वा क्षुद्र होतो, एवढं सांगून ते थांबले नाहीत. त्यांच्या दर्शनाला जेव्हा हरिकेशी चांडाळ आला तेव्हा त्याला लोक दूर हाकलू लागले. तेव्हा महावीरांनी त्याला जवळ घेतले. ते म्हणाले, जात-पात काही नसतं. धर्म पाळणारा कुणीही मोठा होऊ शकतो. हा विचार त्या काळी मोठा बदल घडवून आणणारा होता.

स्त्रीशक्तीचा आदर तो काळ बहुपत्नीत्वाचा होता. पट्टराण्यांचा, दासीप्रथेचा होता. धन-धान्य, भांडी-कुंडी, सोने-नाणं, हत्ती-घोडे यामध्येच स्त्रीची गणना होत होती. जिंकलेल्या राजाला हरलेला राजा नजराणे देई. त्यामध्ये धन-धान्य, सुवर्ण, हत्ती, घोडे यांबरोबरच स्त्रियाही भेट देत असत. स्त्रीला मोक्षाचा अधिकार नव्हता. ती अस्पृश्‍य, ती नरकाचे द्वार, ती पत्नी- पतनी-पतन करणारी समजली जात होती. अशा वेळी महावीरांनी तिला मुक्तीचा, देवधर्माचा अधिकार दिला. तिला समान वागणूक व आत्मोन्नतीचा हक्क आहे असं म्हटलं. चंदना नावाच्या दासीच्या हातचा आहार घेऊन साऱ्या दास्यत्वाचा त्यांनी उद्धार केला. त्यांच्या संघात 24 हजार संन्यासिनी होत्या.

केवळ पाच तत्त्वांची जपणूक समाज आणि आत्मोन्नतीसाठी, सुखी जीवन जगण्यासाठी त्यांनी पाच तत्त्वे सांगितली आहेत. अहिंसा, सत्य, अचौर्य, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. खरे बोला, खोटी मापे वापरू नका, हिंसा करू नका, अन्नात भेसळ करू नका, कुणाची वस्तू विचारल्याशिवाय घेऊ नका. अनावश्‍यक वस्तूंचा संग्रह करू नका, परिग्रह वाढवू नका, म्हणजे गरजेपेक्षा अधिक पैसा तोही वाईट मार्गाने जमवू नका. भ्रष्टाचार म्हणजे लबाडी करू नका, जनावरांना आखूड दाव्याने बांधू नका, स्वदार संतोष बाळगा म्हणजे स्वत:च्या पत्नीशिवाय इतर स्त्रीला माता, भगिनी समजा. ब्रह्मचर्य म्हणजे शील पाळा. परपुरुषाला पिता, बंधू व परस्त्रीला माता, भगिनी समजा. ही तत्त्व पाळली तर सुखी व्हालं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.