दिवे (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील दिवे येथील ग्रामपंचायत हद्दीत एक बाधित आढळला आहे. साडेतीन महिन्यांत पहिलाच बाधित आढळल्यामुळे गावकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीकडून बैठक घेऊन उपाययोजना सुरू केली आहे. यावेळी गाव आणि वाड्यामध्ये पाच दिवस शुक्रवार (दि.10) पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक धनाजी कादबाने यांनी दिली.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. यात किराणा दुकान, भाजीपाला, मटण, चिकन, हॉटेल, ढाबे, गॅरेज, केशकर्तनालय व इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. फक्त दवाखाने, मेडिकल व शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेले कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहे, असे उपसरपंच अमित झेंडे यांनी सांगितले. विनामास्क फिरणाऱ्यांवर 500 रुपये इतका दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये, नियम मोडल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी केल्यास प्रति व्यक्ती 100 रुपये दंड आकारला जाईल.