एका दहशतवाद्याचा खात्मा; 4 जवान जखमी
श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्ती पथकावर हल्ला केला. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले, तर चौघे जखमी झाले. दरम्यान, जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला.
अनंतनाग जिल्ह्यातील वर्दळीच्या के.पी.मार्गावर गस्त घालणारे सीआरपीएफचे पथक दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरले. दुचाकीवरून आलेल्या 2 दहशतवाद्यांनी गस्ती पथकावर स्वयंचलित रायफल्समधून अंदाधुंद गोळीबार केला. तसेच, ग्रेनेडही डागले. त्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी तातडीने सुरक्षा दलांच्या रूग्णालयात हलवण्यात आले. जखमींमध्ये अनंतनाग पोलीस ठाण्यातील अधिकारी अर्शद अहमद यांचाही समावेश आहे. त्यांना उपचारासाठी श्रीनगरला हलवण्यात आल्याचे समजते. दरम्यान, हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देताना जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्याच्या साथीदाराने पलायन केल्याचे समजते. ठार झालेल्या दहशतवाद्याकडील एके रायफल ताब्यात घेण्यात आली.