बारामती -बारामती शहर व तालुक्यात शनिवारी (दि. 4) 5 जणांना करोनाची लागण झाली असल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. बारामतीत करोना संक्रमिततिचा आलेख वाढला असून बारामतीकरांची धाबे दणाणले आहेत.
शहरातील अशोकनगरमधील एका वकिलांच्या पत्नीसह, ज्येष्ठ नगरसेवकांचा मुलगा व तांबेनगरमधील एक रहिवासी तसेच, करोनाग्रस्त झालेल्या आयटी अभियंत्याचे तालुक्यातील काटेवाडी येथील एक मित्र तर सावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पुणे शाखेत कार्यरत एक कर्मचारी असे पाचजण करोनाबाधित आढळले आहेत.
करोनामुक्त शहर व तालुक्याला पुन्हा करोनाचा विळखा पडत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाला तातडीने करोना केअर सेंटर करून येथील सर्व कामकाज एमआयडीसीतील महिला रुग्णालयातून करण्याचे निर्देश पवार यांनी आरोग्य विभागास दिले आहे.
नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करावा, अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत काडक उपायोजना अवलंब करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
बाजारपेठांच्या वेळांमध्ये बदल
जळोची -शहरात करोनाबाधितांची संख्या वाढल्याने बाजापेठांमधील दुकानांच्या वेळांमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत दुकाने काही नियम व अटींवर उघडी ठेवण्याची मुभा होती. मात्र, रविवार (दि. 5) पासून दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच उघडी ठेवता येणार आहे. तर नियम व अटी कायम राहणार आहेत.
तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व मास्क विना फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, व्यापाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर होतो की नाही. याकडे लक्ष दिले जाणार आहे. तर जिल्ह्यांच्या सीमा सीमा बंद केला जाणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.