एकाच दिवसात वाहन चोरीचे पाच गुन्हे

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरणाऱ्या टोळ्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शहरात दररोज विविध ठिकाणी वाहने चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. एकाच दिवसात वाहनचोरीचे पाच गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत दाखल झाले आहेत. दुचाकी, चारचाकी चोरणारे चोरटे आता सायकलही चोरु लागले आहेत. वाहनचोरांचा वाढता उपद्रव पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.

भोसरी एमआयडीसी परिसरातील गणराज हॉटेल समोरील किराणा दुकानासमोर लहानू हरिभाऊ आग्रे यांनी त्यांची दुचाकी लावली होती. ते किराणा साहित्य घेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एमएच 14/एवाय/8911) बनावट चावीच्या सहाय्याने चोरुन नेली. तर चिंचवड येथील घटनेमध्ये चोरट्यांनी इंडिका व्हिस्टा या चारचाकी वाहनावर डल्ला मारल्याचे उघड झाले झाले आहे. रियाज शौकत शेख (वय-66) यांनी त्यांची इंडिका गाडी त्यांच्या घरासमोर लावली असता बनावट चावीच्या सहाय्याने चोरट्यांनी ती पळवून नेली.

हिंजवडी येथे अनिल रामगोपाल गुप्ता (वय-60, रा.मारुंजी) यांची 70 हजार रुपयांची दुचाकी (क्र.एमएच 12/पीके/2592) ही चोरट्यांनी चोरुन नेली. वाकड येथे मोहन महादेव चव्हाण (वय-43) यांची 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची पिकअप व्हॅन (क्र. एमएच 10/6936) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेली. निगडी येथील यमुनानगर सोसायटी मधील विनायक घोडके यांची 12 हजार रुपये किंमतीची सायकल चोरट्यांनी चोरुन नेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)