राहाता – शिर्डी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार राहिले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
शिर्डीत विधानसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांनी 13 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीच्या वेळी एक अर्ज अवैध ठरल्याने आठ उमेदवारांचे 12 उमेदवारी अर्ज शिल्लक होते. 7 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी डॉ. भास्कर शेखर बोऱ्हाडे, राजेंद्र सखाराम पठारे, अल्ताफ इब्राहिम शेख या तीन जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, कॉंग्रेसकडून सुरेश थोरात, बहुजन वंचित आघाडीकडून विशाल कोळगे, बहुजन समाज पक्षाकडून शिमोन जगताप, अपक्ष म्हणून विश्वनाथ वाघ हे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील व कॉंग्रेसचे सुरेश थोरात यांच्यात दुरंगी लढत होईल. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख 62 हजार 164 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 62 हजार 63 स्त्री, तर एक लाख 35 हजार 893 पुरुष मतदार आहेत.