Ritu Tawde : ४४ वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर बसला. हा खरंतर पक्षासाठी सुवर्णक्षणच म्हणावा लागेल. मुंबईचा महापौर कोण होणार आणि कोणत्या पक्षाचा होणार यावर बरीच चर्चा झाली. अखेर भाजपने महापौर पदासाठी तीन टर्म नगरसेविका राहिलेल्या रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. काल ११ फेब्रुवारीला मतदानाद्वारे रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर पदी बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त झालेले पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही निवड जाहीर केली. महापौर पदाचा कार्यभार रितू तावडे यांनी स्विकारल्यानंतर त्यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. १ पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना पाणीपुरवठा प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण करून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्येक विभागात पाणी गळती शोधणारी यंत्रणा आणि कॅमेरे बसवले जातील. समान पाणी वितरणासाठी फ्लो मीटर बसवण्यात येतील. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना जलदेयके तसेच मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाईल. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उपाययोजना करण्याचे धोरण आहे. २ महापौर निधीत वाढ दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीप्रमाणे महापौर निधी पाच हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येतील. रितू तावडे यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचा कार्यभार स्विकारला. ३ खड्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे हा अत्यंत गहन विषय आहे. या सतत पडणाऱ्या खड्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईमध्ये युटिलिटी टनेल बनवण्यात येतील. ज्या रस्त्यांची उंची नऊ मीटरपेक्षा कमी आहे त्या डांबरी रस्त्यांची उंची लांबी नऊ मीटरपेक्षा अधिक करण्यात येतील. पादचारी स्नेही पदपथ विशिष्ट प्रकारच्या काँक्रीटपासून केले जातील. पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी भुयारी व जमिनीवरील पार्किंगची निर्मिती करण्यात येईल. ४ फेरीवाल्यांसाठी तातडीने सर्वेक्षण करून प्रमाणपत्र देणार फेरीवाल्यासंदर्भात त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना लगेचच ‘विक्रेता प्रमाणपत्र’ आणि ओळखपत्र देण्यात येईल. सर्व पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन करण्यात येईल आणि हॉकिंग झोन्स व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रे नॉन हॉकिंग झोन्स म्हणून घोषित करण्यात येतील. ५. शाळांमध्ये संविधानातील मूल्ये शिकवली जाणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिलेली मूल्ये शाळांमध्ये शिकवले जातील, या पाच महत्वाच्या घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केल्या आहेत. ‘विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई’ वचनाशी कटिबद्ध राहणार महापौर रितू तावडे यांनी आपल्या भाषणात पाणीपुरवठा, अग्निशमन दल, सार्वजनिक शौचालय, पार्किंग, पाणीपुरवठा प्रकल्प, वैद्यकीय सुविधा, मुंबईत निर्माण होणारी पूरस्थिती, महापालिका शाळांचा दर्जा, गावठाणांचा विकास, पर्यावरणीय आराखडा, खड्डे अशा विविध मुद्यांचा उल्लेख केला. तसेच ‘टँकर माफिया फ्री मुंबई’ हे धोरण राबविणार असल्याचे देखील महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. महायुतीच्या ‘विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई’ या वचनाशी कटिबद्ध राहू, असे आश्वासनही त्यांनी मुंबईकरांना दिले आहे. हेही वाचा : Allergy Awareness: खाद्यपदार्थांतील रसायने आणि वाढती ऍलर्जी; सतर्क राहणं का गरजेचं?