लातूरमधील दोन घरफोड्यातील पाच जणांना अटक

लातूर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने दोन घरफोड्यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून यांच्याकडून 75 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

औसा तालुक्‍यातील खरोसा येथील राजू बाबू सोलापुरे यांचे 18 जुलै 2019 रोजीच्या मध्यरात्री घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाट फोडून आतील 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी, 7 ग्रॅमची बोरमाळ, 6 ग्रॅमचे झुमके असा एकूण 25 हजारांचा ऐवज चोरी गेला होता. तसेच खरोसा येथीलच तात्याराव राजेंद्र जाधव यांच्याही घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती.

या प्रकरणी पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या. गुप्त बातमीदारामार्फत शेडोळ येथील बस स्थानकावर शेडोळ येथील नितीन धुमाळ हा सोन्याचे व चांदीचे दागिने विक्रीसाठी फिरत आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ सोन्याचे मनी, सोन्याचा बदाम, चांदीची चेन असा ऐवज मिळून आला. नितीन धुमाळ याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सदरचे गुन्हे हे त्याचे अन्य साथीदार सुनील केशव लोंढे, विकास बळवंत जाधव, गोपाळ वसंत सूर्यवंशी उर्फ टेकाळे (सर्व रा. शेडोळ) यांनी केले असल्याचे सांगितले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्वांना अटक करून त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला आहे. याच पथकाने शिवपूर येथे घडलेल्या घरफोडीचा समांतर तपास करून चाकूर तालुक्‍यातील सुगाव येथील आग्नेशा शंकर शिंदे यास अटक केली. त्याच्याकडून 69 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)