“हमारे रावण को क्यों मारा’ म्हणत केली आकुर्डीत तोडफोड
पिंपरी – “हमोर रावण को क्यों मारा’, असा आरडा ओरडा करीत आकुर्डी परिसरात वाहनांची तोडफोड करून ट्रान्सपोर्ट नगर येथे उभ्या असलेल्या ट्रकच्या चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या पाच जणांना निगडी पोलिसांनी अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक बनावट पिस्तुल तीन कोयते आणि रोकड असा ऐवज जप्त केला. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून कुप्रसिद्ध रावण टोळीचे सदस्यही आहेत.
अविनाश दिलीप शेलार (वय 19), स्वप्नील उर्फ बबलू शिवाजी वाघमारे (वय 22), नरेश शंकर चव्हाण (वय 19), सूर्यकांत सुनील फुले (वय 19, सर्व रा. वाल्हेकरवाडी), किरण शिवाजी खवळे (वय 20, रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात
घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 11) पहाटे दीडच्या सुमारास अवतार सिंग आणि त्यांचा सहचालक ट्रान्सपोर्टनगर येथे त्यांच्या ट्रकमध्ये (पी.बी. 10/जी.झेड. 5913) आराम करत होते. त्यावेळी पाच जणांच्या टोळक्याने ट्रकची काच फोडली. अवतार सिंग यांच्या तोंडावर कोयत्याच्या मुठीने मारल्याने त्यांचे दात पडले.
सहचालक हरमित सिंग यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून अवतार सिंग यांच्याकडून जबरदस्तीने 2 हजार 200 रुपये चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून एकास पकडले. त्याने तोडफोड आणि मारहाण केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक बनावट पिस्तुल तीन कोयते आणि रोकड ऐवज जप्त केला.