पुणे : राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये “फ्लेक्स वॉर’ सुरू आहे. त्यामुळे, शहरात वाद-विवाद आणि गोंधळ होण्याची शक्यता असल्याने गेल्या तीन दिवसांत शहरात तब्बल 5 हजार 482 जाहिरात फलक महापालिकेने काढले आहेत. शहर पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त बैठकीनंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत माने यांनी दिली.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या जवळपास 40 हून अधिक आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तर, या बंडाचा परिणाम शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढण्यावर झाला असून या बंडामागे भाजपचा हात असल्याची राजकीय चर्चा आहे. त्याचे पडसाद राज्यात उमटू लागले असून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांकडून पक्षाच्या आमदारांची कार्यालये फोडणे, पोस्टर जाळणे तसेच त्याला काळे फासण्याचे प्रकार सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांचे समर्थनाचे फ्लेक्सही लागत आहेत.
मात्र, अनेक नाराज कार्यकर्ते या फ्ल्केसला काळे फासणे, जाळणे अशाप्रकारे भावना करत आहेत. त्यामुळे, राजकीय वादाचे पर्यवसन हाणामारी मध्ये होत आहे. त्यामुळे संभाव्य वाद टाळण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणेकडून शहरात सर्वत्र जाहीरातीचे बोर्ड, फ्ल्केस, बॅनर्स, पक्षाचे झेंडे काढले जात असल्याचे डो. माने यांनी स्पष्ट केले.