शिक्रापुरातील फसलेल्या मांढरे कुटुंबाचा आनंद गगनात मावेना
शिक्रापूर (पुणे)- येथील एका युवकाला पेपर पिशवी बनविण्याची मशीन खरेदीसाठी बॅंक खात्यामध्ये साडेपाच लाखांहून अधिक पैसे भरून घेतले. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी तपास लावत साडेपाच लाख रुपये या युवकाला परत मिळवून दिले.
याबाबत फसवणूक झालेले कैलास किसन मांढरे (रा. शिक्रापूर, बोरमळा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली होती. कैलास मांढरे याने पेपर पिशवी बनविण्याची मशीन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवरून वेगवेगळ्या मशीन कंपन्यांची माहिती घेतली. त्यानंतर मांढरे याने कंपनीच्या नंबरवर संपर्क करून मशीनबाबत माहिती घेतली. कंपनीच्या एका महिलेचा फोन आला त्यांनी मांढरे यांना मशीन बुकिंगसाठी वीस हजार रुपये कंपनीच्या खात्यावर भरण्यास सांगितले.
मशीनची किंमत दहा लाख रुपये असून पन्नास टक्के रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यावेळी मांढरे यांनी ऑक्टोबर 2019 एका बॅंकेतून कर्ज घेऊन पाच लाख पन्नास हजार रुपये पुन्हा या कंपनीच्या बॅंक खात्यामध्ये ट्रान्स्फर केले. मांढरे यांनी वारंवार कंपनीला फोन केला असता अनेक दिवस उलटून देखील संपर्क झाला नाही. नंतर मांढरे यांनी दिल्ली येथील कंपनीच्या बॅंक खात्याची माहिती घेतली असता ते बंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे मांढरे यांच्या निदर्शनास आले.
शिक्रापूर पोलिसांनी दिल्ली येथील कंपनीच्या अज्ञात व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक संदीप जगदाळे यांनी दिल्ली येथे जात कंपनीमध्ये जाऊन तपास केला. मांढरे यांचे फसवणूक झालेले पाच लाख सत्तर हजार रुपये त्यांच्या खात्यावर परत करण्यात आले. त्यामुळे मांढरे यांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे येत कैलास मांढरे, किसन मांढरे, नितीन मांढरे यांनी पोलिसांचा सत्कार करून पोलिसांचे आभार मानले.