सोनाई तिहेरी हत्याकांड ः एका आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता
मुंबई : सहा वर्षापूर्वी संपूर्ण राज्याला हादरून टाकणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावलेल्या सहा पैकी पाच आरोपींच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले. तर अशोक नवगिरे या आरोपीला पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले.
सोनाईतील नेवासा फाटा येथे 1 जानेवारी 2013 रोजी आंतरजातीय प्रेमप्रकरणातून सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) या तिघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली. तर अशोक फलके या आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायालयाच्या फाशीच्या शिक्षेविरोधात आरोपी पोपट दरंदले, प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांनी उच्च न्यायालयाने अपील दाखल केले होते. तर राज्य सरकारच्या वतीने फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती.
या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यानंतर राखून ठेवलेला निर्णय आज जाहिर करण्यात आला. पाच आरोपींची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवताना अशोक नवगिरे या आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावच्या गणेशवाडीतील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी त्रिमूर्ती ही बीएडचे शिक्षण घेत होती. याच संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन घारूसोबत तिची मैत्री झाली आणि त्यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याची कुणकूण दरंदले कुटुंबाला समजल्यानंतर पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, त्यांचे चुलत बंधू रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश दरंदले (मुलीचा भाऊ), संदीप कुऱ्हे (मुलीचा मावसभाऊ), त्यांचे नातेवाईक अशोक फलके व अशोक नवगिरे यांनी एकेदिवशी सेफ्टी टॅंक दुरुस्तीचा बहाणा करून सचिन, संदीप आणि राहुल यांना बोलावून त्यांची निर्घृण हत्या केली.
यावेळी संशयितांनी संदीप धनवारला सेफ्टी टॅंकच्या पाण्यामध्ये बुडवून मारण्यात आले. तर तिथून पळून जाणाच्या प्रयत्न करणा-या राहुल कंडारे याचा कोयत्याने वार करून, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये घालून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.