भोसरी येथील दरोडा प्रकरणी पाच आरोपींना अटक

पिंपरी – टेल्को कंपनी येथे 17 एप्रिल रोजी कोयत्याने वार करुन दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. संदीप एकनाथ शिंदे (वय-19 रा. दिघी), गौतम हरीदास माने (वय-40 रा. औंध), भूषण दिनेश गायकवाड (वय-20 रा.ताडीवालारोड, पुणे), निलेश उर्फ गोट्या विठ्ठल शेडगे (वय-20 रा. कोरेगावपार्क, पुणे) सुशिल अच्युतराव सूर्यवंशी (वय-24 रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रदिप गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.

खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे एका मनी एक्‍सचेंज व्यवसायामध्ये काम करतात. 17 एप्रिल रोजी त्यांना एक फोन आला व आपण टाटा मोटर्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून 12 ते 15 हजार डॉलर बदली करुन हवे असल्याची मागणी केली. त्यानुसार मोहन अडागळे आणि प्रदीप गायकवाड चलन बदलीसाठी मोठी रक्‍कम घेऊन टाटा मोटर्स कंपनीकडे निघाले. भोसरीतील टाटा मोटर्स पार्किंगजवळ बुधवारी दुपारी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. अडागळे प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्या हातावर कोयत्याने वार केले, तरी देखील अडागळे यांनी बॅग सोडली नाही. चोरट्यांनी पळून जाताना अडागळे यांचा मोबाईल मात्र हिसकावून नेला होता.

मंगळवारी (दि.23) नाशिक फाटा येथील सार्वजनिक पार्किंग जवळ सापळा लावून पथकाने पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण 1 लाख 20 हजारांची ऐवज जप्त केला. यातील शेडगे या आरोपीवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, अशोक दुधवणे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगम, आशिष बोटके, सागर शेडगे, सुधीर डोळस व प्रदिप गोडांबे यांच्या पथकाने केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.