पुणे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे व त्यांचे सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे आयोजित आयर्न मॅन स्पर्धेत यश मिळवले. ते पुणे शहरात समर्थ, मुंढवा पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट पाचमध्ये कार्यरत होते. त्यांनी दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्यासंदर्भात जागृत रहावेत यासाठी सायकलवर पेट्रोलिंग हा उपक्रम राबवला होता.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, बस्लटन येथे १ डिसेंबर रोजी आयर्न मॅन ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातून १७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ११०० स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण केली. त्यामध्ये पुण्यातील जवळपास १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
पुण्यामध्ये यापूर्वी कार्यरत असलेले व सध्या उल्हासनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाने यांनीही स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याचबरोबर त्यांचा मुलगा गौरंग ताम्हणे (१८) तसेच त्यांचे सहकारी विजय अनपट व संदीप पाचपुते यांनी देखील सहभाग घेतला होता.
स्पर्धे दरम्यान थंडी ऊन, वारा, पाऊस यामुळे मुलगा गौरांग यास स्पर्धा अर्धवट सोडावी लागली. आयर्न मॅन स्पर्धेत ३.८ किमी जलतरण १८० किलो मीटर सायकलिंग आणि ४२.२ किलो मीटर धावणे हे सलग १७ तासामध्ये पूर्ण करणे आवश्यक असते. ते करत असताना स्पर्धकाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागतो. ताम्हणे यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी ही स्पर्धा पुर्ण केली आहे.