मासळी, मटणाची मागणी निम्म्याने घटली

मासळीचे भाव 10 ते 20 टक्‍क्‍यांनी उतरले; गावरान अंड्याच्या भावात शेकड्यामागे 20 रुपयांनी घट

 

पुणे – देशात नवरात्रोत्सव सुरू आहे. या कालावधीमध्ये अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे मासळी आणि मटणाची मागणी नेहमीच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे.

त्यामुळे मासळीचे भाव 10 ते 20 टक्‍क्‍यांनी उतरले. तसेच, करोनामुळे शहरात विविध ठिकाणी भरणारा बंगाली खाद्य महोत्सव रद्द झाल्याचा फटका मासळी विक्रीला बसला असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

मागणी कमी असली तरीही मटण आणि चिकनचे भाव स्थिर आहेत. तर अंड्यामध्ये गावरान अंड्याला मागणी आहे. त्यामुळे गावरान अंड्याच्या भावात शेकड्यामागे 20 रुपयांनी घट झाली. इंग्लिश अंड्याच्या भावात मात्र 25 ते 30 रुपयांनी घट झाली आहे.

गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे 5 ते 6 टन, खाडीची सुमारे 100 किलो आणि नदीच्या मासळीची 200 ते 400 किलो आवक झाली. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 8 ते 9 टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.