दूषित सांडपाण्यामुळे तलावातील मासे मृत

पिंपळे जगताप ग्रामस्थांची कंपन्यांवर कारवाईची मागणी : महसूलकडून पंचनामा

केंदूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील प्रथमदर्शनी भारत आणि एचपीसीएल कंपनीच्या केमिकल मिश्रणरहित दूषित सांडपाणी गावच्या पाझर तलावात पाइप लाईनद्वारे सोडल्यामुळे तलावातील मासे मृत पावले असल्याचे समोर आले आहे.

गेल्या सात ते आठ दिवसांपासून भारत आणि एचपीसीएल कंपनीने दूषित पाणी गायरान भागातील पाझर तलावाच्या बाजूला मोठा खड्डा खोददून त्यात पाइपलाइनद्वारे पाणी सोडले. त्या खड्ड्यात पाणी जास्त झाल्याने हे प्रदूषित पाणी थेट पाझर तलावात गेल्याने तलावातील मासे मृत पावले असल्याची माहिती समोर आली. तलावाच्या शेजारीच गावची पाणी पुरवठा विहीर असल्याने नागरिकांनाही भविष्यात साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची भीती ग्रामस्थ व्यक्‍त करीत आहेत.

गायरान भागात शेतकरी चाऱ्याच्या शोधात आपली जनावरे चरायला घेऊन येत असतात. त्यामुळे ही जनावरे तलावातील पाणी पितात. तलावातील मासे मृत पावल्यामुळे शेतकरी जनावरे गायरानमध्ये चारण्यासाठी देखील घेऊन येत नाहीत.

मंडलधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यांनतर ग्रामस्थ आणि अधिकारी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीत जाण्यास मज्जाव केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे दूषित पाणी आमच्या कंपनीचे नसल्याचे सांगत आहेत. यापूर्वी देखील अनेकवेळा ग्रामपंचायतीने हद्दीतील सर्व कंपन्यांना सांडपाण्याची व्यवस्था करण्याचे वारंवार पत्रकाद्वारे कळविले होते.

मात्र, कंपनी प्रशासनाने कोणतीही जबाबदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तक्रारदार दौंडकर यांच्या झालेल्या नुकसानीचा आणि दूषित सांडपाण्यामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांपासून शासनाने आम्हाला वाचवण्यासाठी संबंधित कंपन्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, भारत गॅस कंपनीचे अधिकारी गोपाल हटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हे दूषित पाणी आमच्या कंपनीचे नाही. तसेच एचपीसीएल कंपनीचे अधिकारी बाबासाहेब सोनावणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पंचनामा तहसीलदारांकडे पाठविला
तलावामध्ये मत्स्यबीज सोडून मत्स्यपालन व्यवसाय करण्याचे शासकीय कंत्राट गावातील शेतकरी रमेश नाथोबा दौंडकर यांना मिळाले आहे. दौंडकर यांनी तलावात मत्स्यबीज सोडून मत्स्यपालन करून उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु तलावात काही कंपन्यांनी दूषित पाणी सोडल्याने मासे मृत पावल्याने दौंडकर हवालदिल झाले आहेत.

त्याच पार्श्‍वभूमीवर दौंडकर आणि इतर काही ग्रामस्थांनी मिळून मंडलधिकारी यांच्याकडे तक्रार करून पाहणी करण्याचा अर्ज केला होता. त्यानंतर मंडलधिकारी चंद्रशेखर ढवळे यांनी या प्रकरणाचा पंचनामा करून शिरूरच्या तहसीलदारांकडे पाठवला असल्याचे ढवळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.