पुणे – पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाचे वर्ग 1 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहे. यंदाच्या प्रथम वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रसिद्ध करीत त्यानुसार विद्यापीठांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
करोनामुळे यंदाच्या वर्षी उच्च शिक्षणाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले. त्या पार्श्वभूमीवर “यूजीसी’ने तज्ज्ञांची समिती नेमली होती. त्यांच्या शिफारशीनंतर “यूजीसी’ने पदवी आणि पदव्युत्तर प्रथम वर्षाचे गाइडलाइन जाहीर केली. पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. बारावीनंतरच्या जेईई मेन्स, नीट परीक्षा, राज्यस्तरावरील सीईटीच्या निकालानंतर विद्यार्थी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्राधान्य देतात. ऑक्टोबर अखेरपर्यंत बारावीनंतर होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण होतील. त्यामुळे पहिल्या वर्षाच्या रिक्त जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत असेल, असेही “यूजीसी’ने म्हटले आहे.
दरम्यान, अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार असून, त्याचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. या निकालास विलंब झाल्यास विद्यापीठांना तसे नियोजन करून 18 नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू शकतील.
ऑफलाईन, ऑनलाईन या दोन्ही पर्यायातून अध्यापनाची प्रक्रिया सुरू करता येणार असल्याचे “यूजीसी’ने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेनंतर एक-दोन महिन्यांची सुटी नसेल. केवळ सात दिवसांची दोन सत्रात सुटीसाठी कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर 30 ऑगस्ट 2021 पुढच्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असल्याचे “यूजीसी’ गाइडलाइनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
यूजीसीने पदवी आणि पदव्युतरचे शैक्षणिक वर्ष दि.1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासाठीतील पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 31 ऑक्टोबरपर्यंत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करण्यासाठी दि. 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.’
– डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी
प्रथम वर्षाचे वेळापत्रक
- प्रत्यक्षात वर्ग सुरू होणार : 1 नोव्हेंबर 2020
- शैक्षणिक ब्रेक : 1 ते 7 मार्च 2021
- परीक्षेचे आयोजन : 8 ते 26 मार्च 2021
- सेमिस्टर ब्रेक : 27 मार्च ते 4 एप्रिल 2021
- दुसऱ्या सेमिस्टरचे वर्ग : 5 एप्रिलपासून 2021
- शैक्षणिक ब्रेक : 1 ते 8 ऑगस्ट 2021
- सेमिस्टर परीक्षेचे नियोजन : 9 ते 21 ऑगस्ट 2021
- नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात : 30 ऑगस्ट 2021