#T20WorldCup #PAKvWI | आझम, झमानच्या खेळीने पाकचा विजय

सराव सामन्यात वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून मात

दुबई – कर्णधार बाबर आझम व फखर झमान यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला.

वेस्ट इंडिजला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळे 20 षटकांत 7 गडी गमावून अवघ्या 130 धावाच करता आल्या. जागतिक स्तरावरील विविध देशांत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेसारख्या स्पर्धांमध्ये तुफानी फटकेबाजी करणारा ख्रिस गेल साफ अपयशी ठरला. त्याने केवळ 20 धावा केल्या.

शेमरन हेटमायरने 28 धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अली, हॅरिस रौफ व शाहिन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पाकिस्तानने 15.3 षटकांत 3 गडी गमावून 131 धावा करत विजय प्राप्त केला.

महंमद रिझवान व महंमद हाफिज लवकर बाद झाल्यानंतरही बाबर आझमने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने आपल्या 50 धावांच्या खेळीत 41 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. त्याला सुरेख साथ देताना फखर झमानने 24 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 46 धावांची खेळी केली.

त्याला अर्धशतक मात्र पूर्ण करता आले नाही. तो बाद झाल्यावर माजी कर्णधार शोएब मलिने नाबाद 14 धावा करत बाबरला साथ देत संघाचा विजय साकार केला. वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्शने 2 गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.