आधी मुलाला पाठवतात, मग स्वतः पक्षांतर करतात 

नगर – नेत्याचा पोरगा नेताच व्हायला हवा का? जो लोकांची कामे करतो त्याला नेता केले पाहिजे. तुमच्या भागात मुलाला तिकीट दिले नाही की आधी मुलाला दुसऱ्या पक्षात पाठवले जाते व नंतर बाप असलेला नेताही त्या पक्षात जातो,अशी कोपरखळी सध्याच्या पक्षातंरावर मारत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैयाकुमार याने स्थानिक समस्या सोडविणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन केले. कन्हैयाकुमारची सभा आज नगर शहरात झाली.

सभेपूर्वी त्याने पत्रकारांशी संवाद साधला. कन्हैयाकुमार म्हणाला,सावरकर यांना भारतरत्न देणे म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल.राज्याच्या प्रश्‍नावर कुणीच बोलत नाही.प्रत्येक प्रश्‍नावर केवळ 370 व राममंदिर हेच मुद्दे का आणले जात असतात. दुसरीकडे कॉंग्रेस व अन्य पर्याय असलेले नेते ईडीच्या भितीने एका रात्रीत गांधीजींचे गुणगाण सोडून नथुराम गोडसे यांची स्तुती करत आहेत.

बेरोजगारी, महागाई, स्थानिक समस्या सोडविणाऱ्या उमेदवाराला निवडणून द्या असे आवाहन कन्हैयाकुमार याने केले. यावेळी शाहीर संभाजी भगत, उमेदवार बहिरनाथ वाकळे, सुभाष लांडे, सुधीर टोकेकर, महेबूब सय्यद, बन्सी सातपुते, अनंत लोखंडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.